गडचिरोली- कोरोना महामारीमुळे सध्या खासगी वाहतुकीवर प्रतिबंध आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने अनेक खाजगी वाहन चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, नियमांमध्ये शिथिलता देऊन ५ अधिक १ प्रवासी काळी-पिवळी टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा जय महाराष्ट्र काळी-पिवळी टॅक्सी चालक संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
वाहतुकीवर बंदी असल्याने अनेक टॅक्सी चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोनवर खरेदी केलेल्या काळी-पिवळी टॅक्सीचे हप्ते भरणे कठीण जात असून फायनान्स कंपन्या हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहेत. मात्र, वाहतूक बंद असल्याने हप्ते भरण्यास अडचण जात असून या बाबीचा विचार करून जिल्हांतर्गत काळी-पिवळी टॅक्सी वाहतुकीला पाच अधिक एक प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जय महाराष्ट्र काळी-पिवळी टॅक्सी चालक मालक संघटनेने केली आहे.