गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे ५ जानेवारी पासून तीन दिवशीय ठाकूरदेव यात्रा पार पडली. यात्रेमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासीबांधवही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. देवस्थान समिती, मुक्तिपथ व परिसरातील जनतेच्या प्रयत्नातून ही यात्रा शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त झाली. यासाठी इलाक्यातील ७२ गावांतील पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले.
सलग तीन दिवस जनजागृती -
धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये,यासाठी सुरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तीपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात आली. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केला गेला. मार्कंडा व चपराळा यात्रेप्रमाणेच सुरजगडची यात्रा देखील शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. यासाठी पारंपारिक इलाका समितीने ठराव घेऊन दारू व तंबाखूचे सेवन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले होते.
यात्रेत फिरून दुकानांची तपासणी-
यात्रेदरम्यान दुकानातून तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची निवड सुद्धा करण्यात आली होती. यामुळे कोणीही खर्रा किंवा दारू पिऊन दिसला नाही. यात्रेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद बंग, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक किशोर मलेवार, साईनाथ मोहुर्ले, डॉ. राकेश नागोसे, डॉ. कन्नाके, डॉ. मेश्राम, डॉ. नंदू मेश्राम, गणेश कोलगिरे, राकेश ढवळे यांनी भेट देऊन पारंपरिक गोटुल समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यात्रेत फिरून दुकानांची तपासणी केली असता एकाही दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसली नाही. यामुळे मुक्तीपथच्या प्रयत्नांतून सुरजागडची यात्रा शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त झाली आहे.