गडचिरोली- नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश राऊतला आज गडचिरोलीतील आरमोरीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. तर कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांशी सबंध असल्यावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याच्या जामीन अर्जावर गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी आता २६ जुलैला होणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आरमोरी येथे रॅली काढण्यात आली होती. मात्र, या रॅलीला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे आरमोरी पोलिसांनी महेश राऊतसह डॉ. महेश कोपुलवार, रमेशचंद्र दहिवडे, हिरालाल येरमे, अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, चंद्रकांत मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, हरिपाल खोब्रागडे, अमोल दामले, मीनाक्षी सेलोकर, मंजुषा बेंद्रे, सिंधुताई कापकर, देवराव चवळे या १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते.