गडचिरोली -राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता, आजही काही गावात आवश्यक तितकाही विकास झाला नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोतील बोदली गावातील लोकांसोबत ईटिव्ही भारतने चर्चा केली आहे.
पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम मतदारांमध्ये प्रतिनिधींबाबत मोठा रोष
निवडणुकीच्या काळात भेटीगाठी घेणारे उमेदवार, निवडून आल्यानंतर मात्र मतदारसंघातील काही भागात फिरकतही नाही, असे बोलत बोदली गावातील जनतेने आपला प्रतिनिधींबाबतचा रोष व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर, आमच्या गावात आमदारांचा पत्ताच नाही असे, येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'
रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आजही कायम
प्रचार काळात उमेदवार अनेक घोषणा करतात, मात्र नंतर या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच आजही गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत समस्यांसह शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत, असे बोदली ग्रामस्थांनी सांगितले आहे.
सरकारच्या अनेक योजनांपासून गाव अजूनही अनभिज्ञ
शासनाच्या अनेक योजना आजपर्यंत पोहोचल्याच नाही, असा धक्कादायक खुलासा बोदली गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच बारमाही रोजगार उपलब्ध होईल, असे काही उपाय सरकारकडून व्हावे, असे येथील ग्रामस्थांना वाटत आहे. तसेच यापुढे केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या गावातील शेतकऱ्यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरेतून सरकारची कामगिरी