गडचिरोली -नक्षलवाद्यांनी इशारा देणारे बॅनर्स लावून, रस्त्यात पत्रके टाकल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली मार्गावर बुधवारी समोर आली आहे. नक्षल शोध अभियानाच्या नावावर आदिवासी लोकांना त्रास देणे बंद करा, असा इशारा या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
'आदिवासी लोकांना त्रास दिल्यास वाईट परिणाम होतील'
आल्लापल्ली मार्गालगत असलेल्या जंगलामध्ये हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. बॅनरखाली 2 बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. त्या बाटल्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर सापडली आहे. दरम्यान या बाटल्यांची पोलीस आणि बॉंम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. या बॅनरच्या मजकुरात नक्षलविरोधी पोलीस दल C-60 ला इशारा देण्यात आला आहे. नक्षल शोध अभियानाच्या नावावर आदिवासी लोकांना त्रास देऊ नका. खोटे अभियान राबवून आदिवासींच्या जल-जंगल- जमिनीवरील अतिक्रमण बंद करा, त्यांचे घरे जाळू नका, अन्यथा वाटई परिणाम होतील असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. दरम्यान कोरोना काळात जवानांना सरकार मुद्दाम जंगलात नक्षल शोध अभियानासाठी पाठवत आहे. जवानांनी जंगलात येण्यासाठी नकार द्यावा असे आवाहन कराणारा मजकूर देखील अन्य एका पत्रात छापण्यात आल्याचे आढळून आले आहे.