गडचिरोली- नक्षल चळवळीला कंटाळून सहा जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश असून एक महिला गर्भवती आहे. कंपनी नंबर 4 मध्ये कमांडर असलेला गोकुळ उर्फ संजू मडावी (वय 30) याचाही समावेश आहे. या सहाही जणांवर 32 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पण केलेल्या सहाही नक्षलवाद्यांचा भुसुरुंग स्फोट, हत्या अशा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
नक्षल चळवळीला हादरा; गडचिरोली पोलिसांसमोर ६ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी
गोकुळ उर्फ संजू मडावी
हा नोव्हेंबर 2005 मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून भरती होऊन २०१३ ला कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य व २०१७ मध्ये कंपनी कमांक ४ च्या कमांडर पदावर काम करत होता. त्याच्यावर १५ चकमकीचे गुन्हे, ३ खुनाचे गुन्हे, ०६ ब्लास्टींगचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शासनाने ८ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
रतन उर्फ मुन्ना भिकारी कुंजामी
हा २२ वर्ष वयाचा नक्षलवादी सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलममध्ये सामील होऊन जानेवारी २०१५ पासून एप्रिल २०१९ पर्यंत प्लाटून क्रमांक ११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा विजापूर घाट चकमक (२०१७), आयपेंटा चकमक (२०१८) मध्ये सहभाग होता. त्याचे कार्यक्षेत्र मदेड एरियात असल्याने छत्तीसगड राज्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
सरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो
ही २० वर्ष वयाची नक्षलवादी नोव्हेंबर २०१३ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर दादापूर येथील रोडच्या कामावरील वाहने जाळपोळीच्या गुन्ह्यासोबतच ३ चकमकींचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
शैला उर्फ राजे मंगळु हेडो
ही २० वर्ष वयाची नक्षलवादी जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन फेब्रुवारी २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर ३ चकमकीचे, १ जुना, ३ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने ४ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीसही जाहीर केले होते.
जरीना उर्फ शांती दानू होयामी
ही २९ वर्ष वयाची नक्षलवादी ऑगस्ट २००४ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २००७ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये ए.सी.एम. पदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ८ चकमकीच्या गुह्यांसह एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
मिना धुर्वा
ही २२ वर्ष वयाची माओवादी जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर शासनाने ४ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये 4 महिला व 2 पुरुष आहेत. दलममध्ये काम करताना दलममध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचार या सर्व बाबींना कंटाळून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहाही जणांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. चालू वर्षात आतापर्यंत 14 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासनाच्या नवजीवन योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जाणार आहे.