गडचिरोली - राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे. शिवसैनिकांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते गडचिरोली येथे आयोजित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवत आहे. त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करायची आहे. निवडणूक निकालानंतर आघाडीतील घटक पक्षांशी युती करण्याचे मार्ग मोकळे राहतील, असेही ते यावेळी म्हणाले. प्रारंभी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा संघटक विलास कोडाप, किरण पांडव, विलास ठोंबरे, डॉ. अश्विनी धात्रक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांना प्रतिक्रिया देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्हयातील 361 ग्रामपंचायतींची निवडणूक - जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात 15 जानेवारीला तर दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारीला मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जानेवारी तर निकालाची अधिसूचना २७ जानेवारीला काढली जाणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सुधारित निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टप्प्यात सहा-सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारी २०२१ रोजी चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा येथे होणार आहे. मतदानाची वेळ दोन्ही टप्प्यांसाठी सकाळी ७.३० वा. पासून दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे.