गडचिरोली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी शहरात पोहोचली. यानिमित्ताने शहरात तसेच अहेरी येथेही सभा होणार होती. मात्र, जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे अहेरीची सभा रद्द झाली. तर या सभेला जिल्ह्यातील पक्षाचे दिग्गज नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची आश्चर्यजनक अनुपस्थिती होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
गडचिरोलीतील शिवराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित हेही वाचा -भास्कर जाधवही 'शिव'बंधनात, १३ सप्टेंबरला करणार पक्षप्रवेश
राज्यात सध्या आयाराम-गयारामांचे दिवस आहेत. सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षांतर केले आहे. जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळापासून दिग्गज पक्षाचे नेते आत्राम भाजपमध्ये दाखल होणार अशी चर्चा होती. मात्र, हा प्रयत्न विविध कारणांनी फसल्यानंतर आता पुन्हा आत्राम भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. शहरात सोमवारी पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पोहोचली तेव्हा जाहीर सभेच्या मंचावर राज्यातील नेते ठळकपणे दिसले. मात्र, पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आत्राम अनुपस्थित राहिले.
हेही वाचा -एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर
तर आत्राम आजारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अगदी कालपर्यंत निवडणूक पुढ्यात असताना अहेरी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात छोट्या-छोट्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे धर्मरावबाबा अचानक आजारी पडल्याने विविध तर्क लावले जात आहेत. तर सध्या पक्षाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते राज्याच्या कार्यकारिणीत सुद्धा आहेत.
हेही वाचा -ओवैसी माझे 'गॉडफादर'; युतीच्या चर्चेसाठी आजही तयार - इम्तियाज जलील
अहेरीसह गडचिरोली हे दोन्ही विधानसभा क्षेत्र यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार अमोल कोल्हे, सरचिटणीस अमित मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर आदी उपस्थित होते.