गडचिरोली- शाळेत विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून कुरखेडा पंचायत समितींतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकास ‘पोक्सो’ कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. श्रीकांत महादेव कुथे, असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
मागील शैक्षणिक सत्रात वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. अलिकडेच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बालहक्क आयोगाने या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुराडा पोलीस ठाण्यात श्रीकांत कुथे याच्यावर बाल लैगिंक अत्याचार कायदा कलम १२, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (३)(२) (५), भा.दं.वि. ३५४ (अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
काल (शुक्रवार) जिल्हा व सत्रन्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, तर आज (शनिवार) त्याचा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला तेथे श्रीकांत कुथे यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून तेथे कार्यरत असलेल्या शिक्षिकेसोबत कुथे यांचे पटत नव्हते. दोघांनीही पालकांना पुढे करुन एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या.
प्रकरण इतके वाढले, की पालकांमध्येच दोन गट निर्माण होऊन एका गटाकडून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणे बंद करून त्या शिक्षिकेच्या बदलीची मागणी करण्यात आली. तर दुसऱ्या गटाकडून शिक्षिकेची बदली केल्यास शाळेला कुलूप लावण्याचा इशारा देण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले होते. याची दखल घेऊन शिक्षण विभागाने कुथे याची तेथून बदली केली. तसेच दोघांचीही एकेक वेतनवाढ रोखण्याची कार्यवाहीसुद्धा केली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. आता पोक्सो कायद्यान्वये शिक्षकास अटक झाल्याने प्रकरणाने पुन्हा नवे वळण घेतले आहे. श्रीकांत कुथे हा एका शिक्षक संघटनेचा जिल्हा सरचिटणीस आहे.