गडचिरोली- जिल्ह्यातील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा आवघ्या ३० दिवसात पूर्ण स्वरुपात उभारण्यात आली आहे. त्यामुळे, येत्या आठ दिवसात जिल्ह्यातच आरटी-पीसीआर कोरोना चाचणी सुरू होणार आहे. ही आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सर्वात प्रशस्त प्रयोगशाळा म्हणून विदर्भात ओळखली जाणार आहे.
आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देवून प्रयोगशाळेच्या तयारीबाबत पाहणी केली. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशीनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बसवण्यात आली आहे. प्रत्येक प्रक्रियेसाठी सूसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. आवघ्या ३० दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पूर्ण करून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून प्रोयगशाळेत आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी, तसेच इतर तपासण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उभारण्यात आलेली आरटी-पीसीआर प्रयोगशाळा ही अत्याधुनिक व प्रशस्त स्वरुपात आहे. आता जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे निदान होणार आहे. यापूर्वी नागपूरहून अहवाल येण्यास २ ते ३ दिवसापर्यंतचा कालावधी लागत असे. आता आरटी-पीसीआर चाचणी सुरू झाल्यानंतर रुग्णांवर केली जाणारी उपचार प्रक्रिया सोपी होईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.
हेही वाचा-गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांचे दोनदा ठरले वेळापत्रक.. तरीही पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की