गडचिरोली - केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करून तेलंगाणातील मंचेरियाल ते सिरोंचा व्हाया वारंगलपर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळवून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे शासकीय दौऱ्यावर नुकताच सिरोंचाला आले असता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृहात त्यांची आविसं पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सिरोंचा शहरापर्यंत रेल्वेजाळे पसरविण्याबाबत सकारात्मक चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनात, सिरोंचा हे तालुका शंभर टक्के तेलगु भाषिकांची असून या तालुक्याची आजपर्यंत पाहिजे. त्या प्रमाणात सर्वांगीण विकास झालेला नसून तालुक्यात एकही उधोगधंदे नसल्याने रोजगाराअभावी दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. तालुक्यातील नागरिकांची पूर्वीपासूनच रोटीबेटी व्यवहारासह आरोग्य किराणापासून तर दैनंदिन दूध आणि दळणवळणासह अन्य संबंध तेलंगणासोबत असल्याने जनतेची अगदी जवळीक तेलंगणाशी आहे.
तालुक्यातील बहुतेक नागरिक हे मंचेरियाल जाऊन बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर व मुंबईचे प्रवास हे रेल्वेने करत असतात तसेच हैदराबादसह आंध्रप्रदेशला जाण्यासाठी वारंगलला जाऊन रेल्वेने प्रवास करत असतात. सिरोंचा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी तसेच अविकसित तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिरोंचा शहरापर्यंत रेल्वेजाळे पासरविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
तेलंगणातील वारंगल व मंचेरियाल या जिल्ह्याला लागून दक्षिण गडचिरोली सिरोंचा ग्रामीण भागही रेल्वे लाईनपासून आजही वंचित आहेत. तर, दोन्ही जिल्ह्याचे ग्रामीण भाग हे सिरोंचा शहराला लागून आहेत. तेलंगणातील मंचेरियाल ते सिरोंचा व्हाया वारंगलचे अंतर फक्त 180 कीमीपर्यंत आहेत. या भागात रेल्वेजाळे पसरावल्यास महाराष्ट्रातील सिरोंचासह तेलंगणाचे वारंगल व मंचेरियाल या दोन्ही जिल्ह्याचे संपूर्ण ग्रामीण भाग रेल्वेने जुळल्यास जलदगतीने विकास होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
खासदार अशोक नेते यांना आविसंचे सल्लागार रवी सल्लम यांनी रेल्वे लाईन मंजुरीबाबत निवेदन दिले. यावेळी सिरोंचा येथील प्रतिष्ठित नागरिक भास्कर आनकरी, राजांना मारगोनी उपस्तीत होते. खासदार अशोक नेते हे निवेदन स्विकारताना त्यांचासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रवि ओल्लालवार, दामोधर अरिगेलावार, सत्यनारायण मंचालवार, डॉ. भरत खटी, संदीप कोरेत, शंकर नरहरी, कलाम हुसेन, माधव कासार्ला, जावेद भाई आदी उपस्तीत होते.