गडचिरोली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रवादी परिवार संवाद' यात्रेची सुरूवात आज (दि. 28 जाने.) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहेरी येथे पहिली आढावा बैठक घेतली. अहेरी, एटापल्ली, शिरोंचा या अतिशय दुर्गम भागातून लोकांनी या संवाद कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी पाटील म्हणाले, परिसरातील घटकांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल
या भागात जलसंपदा विभागाचे विविध प्रकल्प सुरू आहेत. हे काम जलदगतीने करण्यात यावे व या सर्व योजना 2024 पर्यंत कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मेडिगट्टा धरणाचा विषय गंभीर आहे. काही भागात धरणाचे पाणी शिरले आहे. यात नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या लोकांनी आमदार धर्माराव आत्राम यांच्याकडे माहिती द्यावी. जे शेतकरी पात्र आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.