महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैशाची ओवाळणी नको.. दारूबंदी हवी, रक्षाबंधना निमित्त महिलांची पोलीस बांधवांकडे मागणी - दारूविक्री

गुरुवारी देसाईगंज तालुक्यातील २७ महिला रक्षाबंधननिमित्त ओवाळणीचे साहित्य घेऊन देसाईगंज पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी सर्व पोलिसांना राखी बांधून, ‘संध्याकाळ झाली की दारूमुळे गावात भांडणे होतात. दारू विक्रेते जीवे मारण्याची धमकी देतात. हे सर्व बंद होऊन सुखाने जगण्यासाठी आमच्या गावातील दारूविक्री बंद करा, आमचे रक्षण करा’, अशी लेखी ओवाळणी मागितली.

रक्षाबंधन

By

Published : Aug 16, 2019, 8:59 PM IST

गडचिरोली- गावात कधी चोरून, लपून तर कधी उघडपणे दारूविक्री होत असते. याचा त्रास आया-बहिणींनाच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, ‘दादा आम्हाला तुमचाच आधार आहे. आम्हाला राखीची ओवाळणी म्हणून एक रुपयाही नको केवळ आमच्या गावची दारूविक्री बंद करा, हीच आमची ओवाळणी’, अशी भावनिक भेट पोलीस बांधवांना राखी बांधताना महिलांनी वचनाच्या रुपात मागितली.

रक्षाबंधननिमित्त महिलांनी पोलीस बांधवांना मागितले दारूबंदीचे वचन


गुरुवारी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, कुरुड, कोकडी आणि विसोरा या गावांसह देसाईगंज शहरातील शिवाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, गांधी वार्ड येथील २७ महिला स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यावर रक्षाबंधनानिमित्त ओवाळणीचे साहित्य घेऊन देसाईगंज पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी सर्व पोलिसांना राखी बांधून, ‘संध्याकाळ झाली की दारूमुळे गावात भांडणे होतात, मारामारी होते. दारू विक्रेते जीवे मारण्याची धमकी देतात. हे सर्व बंद होऊन सुखाने जगण्यासाठी आमच्या गावातील दारूविक्री बंद करा, आमचे रक्षण करा’, अशी लेखी ओवाळणी मागितली.


यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी उपस्थित सर्व पोलिसांच्या वतीने ओवाळणी म्हणून दारूविक्री बंद करण्याचे वचन दिले. पोलीस २४ तास तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना तुमच्या मदतीची गरज असल्याचेही सांगितले. सध्या तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे आणि पालक म्हणून त्यांना यापासून परावृत्त करणे ही जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दारूबंदी करण्याबाबत महिलांशी चर्चा करून लवकरच कृती करण्याचेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका मुक्तिपथ चमूतर्फे करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details