महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोरी गावालगतच्या प्राणहिता नदीकाठी महिलांनी १०० ड्रम सडवा केला नष्ट - राजपूरपॅच

जवळपास १०० प्लास्टिक ड्रम महिला व युवकांनी नष्ट केले. महिला व पोलिसांना पाहून दारू गळणाऱ्यांनी पळ काढला.

महिला सडवा नष्ट करताना

By

Published : Apr 17, 2019, 11:36 AM IST

गडचिरोली - उन्हाळ्यात कोरड्या पडत चाललेल्या बोरी गावालगतच्या प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळली जात होती. याची माहिती मिळताच महिलांनी या परिसरात धडक कारवाई करताना तब्बल १०० ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि ड्रमही जाळून नष्ट केले. राजपूरपॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी ही कारवाई केली.

सडवा नष्ट करताना महिला आणि युवक

अहेरीपासून २० किमी अंतरावरील बोरी गावाला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर गावठी दारू गाळण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो. उन्हाळ्यामुळे नदी कोरडी पडत असल्याने नदीच्या मधोमध असलेल्या झाडीझुडपांमध्ये सडवा लपून ठेवला जातो. राजपूरपॅच आणि बोरी या दोन्ही गावातील लोक दारू गाळण्याचे काम करतात. ४ दिवसांपूर्वी राजपूरपॅच येथील महिलांनी तिना नदी परिसरात असलेला गुळसडवा नष्ट केला होता.

सडव्याचे साठे बोरी गावाला लागून असलेल्या प्राणहिता नदी परिसरात असल्याची माहिती राजपूरपॅच येथील महिलांना मिळाली. त्यांनी बोरी येथील महिलांना याबाबत माहिती देत अहिंसक कृती करण्याचे आवाहन केले. पण बोरी येथील महिला तयार नसल्याने राजपूरपॅच येथीलच महिला व युवकांनी ही अहिंसक कृती करण्याचा निर्णय घेतला. बोरी येथील पोलीस पाटील सत्यवान मोहुर्ले हेदेखील या कारवाईत सहभागी झाले होते.

अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी मेजर घाटघुमर यांना कारवाईसाठी पाठविले. या धडाकेबाज कारवाईत नदी परिसरात गुळसडवा भरून ठेवलेले जवळपास १०० प्लास्टिक ड्रम महिला व युवकांनी नष्ट केले. महिला व पोलिसांना पाहून दारू गळणाऱ्यांनी पळ काढला. सातत्याने अशा अहिंसक कारवाई करण्याचा निर्धार गाव संघटनेच्या महिलांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details