गडचिरोली -जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती मात्र अद्यापही कायम आहे. भामरागड २० दिवसात चौथ्यांदा पुराच्या विळख्यात सापडले आहे. भामरागड मध्ये पाणी शिरले असून तिथला संपर्क तुटला आहे. त्यामुळे भामरागडमधील ४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
गडचिरोलीत पूरस्थिती कायम; भामरागडचा चौथ्यांदा तुटला संपर्क - gadchiroli flood
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पूरस्थिती मात्र अद्यापही कायम आहे. भामरागड २० दिवसात चौथ्यांदा पुराच्या विळख्यात सापडले आहे. भामरागड मध्ये पाणी शिरले असून तिथला संपर्क तुटला आहे. त्यामुळे भामरागडमधील ४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
सर्वच सिंचन प्रकल्पांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्या-उपनद्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १२ पैकी ९ तालुके अतिवृष्टीग्रस्त आहेत. जिल्ह्यातील धानोरामध्ये १४१ मिमी, चामोर्शीमध्ये १०१ मिमी, देसाईगंजमध्ये १४० मिमी, आरमोरीमध्ये ११८ मिमी, कुरखेडामध्ये १४३ मिमी, एटापल्लीमध्ये १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पूरस्थितीवर परिणाम करणारे गोसेखुर्द, दीना, चिचडोह, मेडीगड्डा, येंगलखेडा सिंचन प्रकल्प भरल्याने नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.
जिल्ह्यात एकूण १८ मुख्य मार्ग पुराचे पाणी आल्याने सकाळी बंद होते. त्यातील ८ पूर्ववत झाले असून अद्याप १० मार्ग पाण्याखाली आहेत.नागपूर-हैद्राबाद, राजनांदगाव येथे जाणारी वाहने अडकून पडली आहेत. भामरागड येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, छत्तीसगड राज्यातील मुसळधार पावसामुळे भामरागडचे प्रवेशद्वारावर असलेल्या पर्लकोटा नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास भामरागडची पूरस्थिती आणखी वाईट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशासन परीस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली आहे.