गडचिरोली - कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्व प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच प्रशासनाची मदत घेवून कामांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रवासी वाहतूक पडताळणी, देशाबाहेरुन आलेल्या व्यक्ती, कोरोनाबाधित राज्य अथवा शहरातून आलेली व्यक्ती याबाबतची माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र वार्ड विलगीकरणासाठी सुरू करण्यात आला आहे. तसेच विलगीकरणासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केल्यानंतर विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस यंत्रणा परदेशवारी करुन आलेले तसेच हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या बाहेरच्या व्यक्तींची माहिती घेणार आहेत. पोलीस कोरोनाबाबत सोशल मिडीयावर अथवा अन्य मार्गाने अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. गर्दीची ठिकाणांवरही प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे अशा कामांचा त्यामध्ये समावेश आहे.
आरोग्य विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त येणारे सर्व विभाग कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार आहेत. यासाठी ग्रामीण ते जिल्हा पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था, घरोघरी जाऊन संशयित व्यक्तीची तपासणी, ग्रामीण भागात शासकीय दवाखान्यामध्ये कोरोनाबाबत विलगीकरणासाठी खाटांची व्यवस्था तसेच या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
अन्न व औषधी प्रशासनाला औषध विक्री, मास्क व सॅनिटायझर यांच्या पुरवठ्याबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना अचूक माहिती देऊन औषध विक्रत्यांना औषधांची व इतर साहित्यांची साठेबाजी करू न देण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच चूकीच्या माहितीमधून नागरीकांना औषध व इतर साहित्यांचा पूरवठा करणे व लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामीण भागात महसूल विभागाकडून तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून कोरोनाबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.