गडचिरोली - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही दळणवळणाची साधन नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून किंवा खाटेवर उचलून आणावे लागत आहे. तर, वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. असाच एक प्रकार भामरागड तालुक्यात बुधवारी (दि. 8 जुलै) सायंकाळच्या दरम्यान घडला असून वेळेवर उपचार न मिळाल्याने चार महिन्याच्या गरोदर मातेला आपला जीव गमवावा लागला. जया रवी पोदाडी (वय 23) असे मृत महिलेचे नाव असून ती गुंडेनूर येथील रहिवासी आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू, रस्त्याअभावी उपलब्ध होऊ शकले नाही वाहन जिल्ह्यातील भामरागड हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग आहे. या परिसरात अजूनही पक्के रस्ते आणि नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात टाकून पायवाट काढावे लागते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भामरागड तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. हाच नाला पार करुन दोन दिवसाअगोदर तुर्रेमरका येथील एका पाच दिवसाच्या बाळंत महिलेला रस्त्याअभावी चक्क 23 किमीची पायपीट करावी लागली. तर, आता त्याच नाल्यापलीकडच्या गुंडेनुर येथील चार महिण्याच्या गरोदर महिलेला खाटेवर उचलून नाला ओलांडून एक किमी रुग्णवाहीकेपर्यंत नेण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे जया पोदाडी उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात पोहचू शकली नाही आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला.
8 जुलैला भामरागड मुख्यालयापासून 21 किमी असलेल्या गुंडेनूर गावातील जया पोदाडी ही महिला आपल्या लहनशा मुलाला घेऊन शेतात गेली होती. शेतात काम करून घरी परतल्यावर अचानक चक्कर आल्याने तिला खाटेवर टाकून गावालागतच्या गुंडे नाल्यातील कंबरभर पाण्यातून वाट काढत नाला पार केले . नंतर, आशा वर्करने लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला फोनद्वारे कळविले लगेच तेथील डॉ. संभाजी भोकरे यांनी नाल्यापर्यंत रुग्णवाहिका पाठवली. तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. लाहेरीवरुन रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ती चार महिन्यांची गरोदर असून तिला जवळपास चार वर्षांचे बाळ आहे. तिच्या मृत्यूचे नेमकं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉक्टर म्हणाले, साडेसहा दरम्यान लाहेरीवरुन डॉ. भोकरे यांचा जया पोदाडी या 23 वर्षीय गरोदर महिलेला रुग्णालयात पाठवत असल्याचा संदेश आला. लगेच 7.10 वाजता रुग्णवाहिकेतून गरोदर महिलेला आणले गेले. मात्र, आम्ही तिला तपासले तेव्हा ती मृत असल्याचे दिसून आले. याबाबत तत्काळ पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. आज 11 ते 12 दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले आहे. आमच्या प्राथमिक अंदाजानुसार तिला गर्भाशयाचा कोणताही त्रास नव्हता. हिमोग्लोबिन 8.4 होते. साप चावल्याचेही लक्षण नव्हते. केवळ ह्रदयात रक्त साठवल्याचे आढळले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावेश वानखेडे यांनी सांगितले.