गडचिरोली - जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यात वीजेची सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्याच्या ठिकाणी सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक व प्रशासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना होण्याची मागणी केली जात आहे.
कोरची तालुक्यात बाराही महिने वीजपुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला भाग आहे. एकूण बारा तालुक्यांपैकी बहुतांश तालुक्यांच्या सीमा विविध राज्यांशी अथवा जिल्ह्यांची जोडले गेले आहेत. या तालुक्यांमध्ये नदी-नाले-जंगल व टेकड्यांमुळे दळणवळणामध्ये बाधा येते. मात्र, हे सर्व अडसर दूर करून विविध तालुके मूलभूत सुविधांनी सुसज्ज होत आहेत. असे असले तरी यातील अतिदुर्गम असा कोरची तालुका मात्र एका वेगळ्याच समस्येने वर्षानुवर्षे ग्रस्त आहे. वर्षातील 12 महिने या तालुक्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडीत असतो.
गडचिरोली मुख्यालयावाटे कोरची येथे वीज पुरवठा करणे अशक्य आहे. त्यामुळे तुलनेने जवळच्या चिचगड आणि लाखांदूर या भंडारा-गोंदिया सीमेवरील गावांमधून सुमारे 100 किलोमीटर वीज वाहिन्या टाकून कोरची तालुक्याच्या ठिकाणी वीजपुरवठा करण्यात आला आहे. हा शंभर किलोमीटरचा भाग जंगलांनी वेढलेला व नैसर्गिक अडसर असलेला आहे. यामुळे झाडे पडून अथवा अन्य बिघाड आल्याने येथील वीज पुरवठा खंडीत होत असतो.
चिचगड आणि लाखांदूर येथून वीज वाहिन्याने एकूण 20 सबस्टेशनच्या माध्यमातून वीज कोरची शहरात येते. यामुळे या 20 पैकी कुठल्याही सबस्टेशन अथवा वीज वाहिन्यांच्या दरम्यान बिघाड उत्पन्न झाल्यास त्याचा थेट फटका कोरची तालुक्याला बसतो. परिणामी कोरची येथे सतत वीज खंडीत असते. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प होते. याशिवाय बँका, व्यापारी प्रतिष्ठाने व घरगुती वीज वापरात बाधा उत्पन्न होते. या सततच्या समस्येने प्रशासन त्रस्त आहे. मात्र, सामान्य नागरिक देखील संतापले आहेत.