गडचिरोली- जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 'ऑपरेशन हिम्मत' राबवण्यात आले होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवत हे ऑपरेशन फत्ते करण्यात यश मिळवले. त्यामुळेच गेल्या २०१४ च्या निवणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत अडीच टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून 'ऑपरेशन हिंमत' राबविण्यात आले होते. या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील ५९१ गावांना ग्रामभेटी दिल्या. ६१ जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण केली. त्याचबरोबर ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त शहरात नक्षलवाद विरोधात आणि मतदार जागृतीसाठी तब्बल १२ हजार महिलांच्या सहभागाने ७ ते ८ किमीपर्यंत ‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी' साकारण्यात आली. त्याचे यशस्वी आयोजन गडचिरोली पोलिसांनीच केले होते. परिणामी महिलांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला.