महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषद अपहार प्रकरण; वरिष्ठ सहायकाची महागडी कार जप्त, चार बँक खातीही सील - गडचिरोली जिल्हा परिषदेत घोटाळा

बलराज जुमनाके हा पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अनेक गंभीर बाबींची त्याने कबुली दिली. मुख्य आरोपींना जिल्हा परिषदेच्या बँक खात्यांची विस्तृत माहिती, तसेच अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी स्कॅन करुन देणे आणि इतर माहिती पुरविण्याच्या मोबदल्यात बलराजला एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजे २८ लाख रुपये मिळाले.

zp
जिल्हा परिषद

By

Published : Aug 28, 2020, 10:37 PM IST

गडचिरोली- जिल्हा परिषदेच्या माजी मालगुजारी तलावाच्या 'पुनर्बाधणी व बळकटीकरण' या लेखाशीर्षाखाली असलेल्या युनियन बँकेच्या खात्यातून बनावट धनादेशाच्या आधारे तब्बल २ कोटी ८६ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेला जिल्हा परिषदेचा कर्मचारी बलराज जुमनाके याची महागडी कार पोलिसांनी जप्त केली आहे. तर त्याचे विविध बँकांचे चार खाते सील केले आहेत.

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत माजी मालगुजारी तलाव 'पुनर्बाधणी व बळकटीरण' या लेखशीर्षकाखाली असलेल्या युनियन बँक खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये इतकी रक्कम आरोपींनी काढून नेली. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळती केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने ९ आरोपींना अटक केली होती. २६ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील वरिष्ठ सहायक बलराज जुमनाके यास अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या १० वर पोहचली.

सध्या बलराज जुमनाके हा पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अनेक गंभीर बाबींची त्याने कबुली दिली. मुख्य आरोपींना जिल्हा परिषदेच्या बँक खात्यांची विस्तृत माहिती, तसेच अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी स्कॅन करुन देणे आणि इतर माहिती पुरविण्याच्या मोबदल्यात बलराजला एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजे २८ लाख रुपये मिळाले. त्यातून त्याने महिंद्रा कंपनीची महागडी कार खरेदी केली. १५ लाख रुपयांची ही कार आज बुधवारी पोलिसांनी जप्त केली. शिवाय त्याचे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एक्सीस बँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसी बँक या चार बँकांचे खातेही सील केले.

आतापर्यंत पोलिसांनी त्याची २० लाख रुपयांची मालमत्ता सील केली आहे. बलराज जुमनाके याने अपहाराच्या रकमेतून आणखी कोणती आणि कुठे मालमत्ता खरेदी केली आहे, याविषयीची पडताळणी सुरु असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details