महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून पोलीस हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न ?

गडचिरोलीमधील कोरची पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पतिराम दर्रो या पोलीस हवालदाराने आज सकाळी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला.

हवालदाराला रुग्णालयात नेत असताना

By

Published : Mar 27, 2019, 5:19 PM IST

गडचिरोली - कोरची पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पतिराम दर्रो या पोलीस हवालदाराने आज सकाळी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दर्रोना तातडीने नागपूरला हलविण्यात आले आहे.

दर्रो हे २१ मार्चपासून नोकरीवर गैरहजर होते. बुधवारी सकाळी ते कर्तव्यावर रुजू झाले. मात्र, काही क्षणातच त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दर्रो यांना गंभीर अवस्थेत कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नागपूरला हलविण्यात आले. यावेळी दर्रो यांचे न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत मृत्युपूर्व जबाब नोंदविणे अपेक्षित असताना त्यांचा जबाब घेण्यात आला नाही.

दर्रो यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप कळू शकले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक दहिफळे यांना विचारणा केली असता, दर्रो यांनी स्वतः गोळी झाडली की बंदुकीची साफसफाई करताना गोळी लागली, हे कळू शकले नाही, असे ते म्हणाले. कामाचा प्रचंड ताण, कुटुंबापासून दूर राहणे, वेळेवर सुट्या न मिळणे इत्यादी कारणांनी जिल्ह्यातील एसआरपी, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी यापूर्वी स्वत:वर गोळ्या झाडल्याच्या घटना घडल्या आहेत. मागच्या वर्षी घोट येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याची बदली होऊनही भारमुक्त न केल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा

दर्रो यांना कोरची दवाखान्यात दाखल करण्यासाठी १०८ नंबरवर फोन करण्यात आला. मात्र, कोरची येथील दवाखान्यात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे ४० किलोमीटर अंतरावरील कुरखेडा येथून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. ही रुग्णवाहिका कोरचीला साडेनऊ वाजता पोहोचली. या रुग्णवाहिकेतील डॉ. चौधरी हे स्वत: न येता त्यांना रुग्णासह रुग्णवाहिका कुरखेड्याला बोलावली. या रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्यामुळे नुसत्या चालकाच्या भरवशावर रूग्णाला ओबड-धोबड रस्त्याने कसे पाठवायचे, असा प्रश्न असतानाच उपस्थित पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करून दवाखान्यात उपस्थित डॉ.कावडकर यांना सोबत घेऊन रुग्णाला देवरी-भंडारा मार्गे नागपूरला पाठविले.

या घटनेमुळे अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य अधिकारी कमी पडत आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास आरोग्य विभागाचे लोकच जबाबदार राहतील, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details