गडचिरोली -जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजतापासून सुरू आहे. यावेळी चामोर्शी येथील मतमोजणी केंद्राबाहेर निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मात्र, त्यांना पोलिसांच्या लाठीचा चांगलाच प्रसाद मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले.
नियमांचे उल्लंघन केल्याने मिळाला प्रसाद -
चामोर्शी येथील केवळराम हारडे महाविद्यालयामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू आहे. हे महाविद्यालय मुख्य मार्गावर असल्याने या मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्याने नागरिकांना निकाल ऐकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभे राहण्यास पोलिसांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही काही अतिउत्साही समर्थक आपला उमेदवार निवडून आल्यानंतर जोशात मुख्य रस्त्यावर येऊन जल्लोष करत होते. त्यामुळे येथे तैनात पोलिसांनी अतिउत्साही समर्थकांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला.