महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर दारू विक्रेत्यांची मालमत्ता जप्त करणार; महागावच्या ग्रामसभेचा निर्णय - Pesa Gram Sabha

अहेरी शहरालगत असलेल्या महागावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी परिसरात गुळाची गावठी दारू बनवून त्याची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते.त्यामुळे अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील ग्रामस्थांनी दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राणहिता नदी परिसरात गुळाची गावठी दारू

By

Published : Jun 5, 2019, 4:26 PM IST


गडचिरोली - अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील ग्रामस्थांनी दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी रात्री तहसीलदारांच्या उपस्थितीत तत्काळ पेसा ग्रामसभा बोलावण्यात आली होती. त्यामध्ये तालुक्यातील दारू विक्रेत्यांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ही दंडाची रक्कम न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे

.
अहेरी शहरालगत असलेल्या महागावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी परिसरात गुळाची गावठी दारू बनवून त्याची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. परिणामी दारू पिण्याऱ्यांची संख्याही वाढल्याने गावकऱ्यांसह इतरांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी गावातून दारू पिऊन जात असलेल्या दुचाकीस्वाराने एका पादचाऱ्यास उडविले. यात तो जागीच ठार झाला होता.

राणहिता नदी परिसरात गुळाची गावठी दारू


त्यामुळे संतापलेल्या लोकांनी तत्काळ पेसा ग्रामसभा घेऊन विक्रेत्यांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी दोन गट तयार केले. या गटाने दुसऱ्याच दिवशी कपडे विक्रीच्या बहाण्याने गावातून दारू मिळते का याची पाहणी केली. त्यामध्ये आलापल्ली येथील एका दारू विक्रेत्यास रंगेहात पकडले.


गाव संघटनेद्वारे मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या उपस्थितीत दुसरी ग्रामसभा बोलावण्यात आली. यावेळी दारूविक्री करणाऱ्या त्या आरोपी विक्रेत्यास १० हजार रुपये दंड भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, ठरलेल्या कालावधीत दंड न भरल्यास तहसील कार्यालयाद्वारे थेट ५० हजार रुपये दंड आकाराला जाणार आहे. याशिवाय तो दंड न भरल्यास तहसील कार्यालयाद्वारे विक्रेत्याची मालमत्ता जप्त करून दंडाची वसुली केली जाणार आहे. या निर्णयामुळे दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details