गडचिरोली- नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याअभावी अनेक रुग्णांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रकार शनिवारी (१३ जुलै) भामरागड तालुक्यातील मिरुगुडवंचा येथे घडला. परिवारातील सदस्यांच्या तत्परतेने प्रसूती कळा सुरू झालेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मात्र, या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांचे विदारक चित्र पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
रस्त्याअभावी गरोदर महिलेसाठी 'खाट'च बनली रुग्णवाहिका; गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र - भामरागड तालुका
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मिरुगुडवंचा येथील रस्त्यांचे विदारक चित्र आजच्या एका घटनेमुळे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. प्रसूती कळा सुरू झालेल्या एका महिलेला रस्त्याअभावी उपचार मिळण्यास उशीर झाला. परंतु, परिवारातील सदस्यांच्या तत्परतेने तिचा जीव वाचला.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मिरुगुडवंचा येथील बाली आकाश लेखामी या गरोदर महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यावेळी तेथील आशा वर्करच्या प्रज्ञा दुर्वा यांनी गरोदर मातेला आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र, गावात येण्यासाठी धड रस्ता नसल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. तेव्हा आशा वर्कर आरेवाडापर्यंत पायी जाऊन रुग्णवाहिकेसाठी माहिती दिली. त्यानंतर डॉ. मडावी यांनी लगेच रुग्णवाहिका पाठविली. मात्र, गावाच्या अलीकडे दीड किलोमीटर अंतरावर मोठा नाला असल्याने रुग्णवाहिका समोर जाऊ शकत नव्हती. तेव्हा आशा वर्कर व चालक नाल्याच्या पलीकडे उभे होते.
याचवेळी गरोदर मातेच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या महिलेला नाल्यापर्यंत आणण्यासाठी खाटेलाच रुग्णवाहिका बनवली. त्या महिलेला खाटेवर झोपवून दीड किलोमीटर चिखलमय व पाय वाटेने नाल्यापर्यंत आणले. तेथुन रुग्णवाहिकेने आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथून रेफर केल्यानंतर हेमलकसा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अनघा आमटे यांनी त्या महिलेची सुखरुप प्रसुती केली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या बाळ आणि माता दोघेही सुखरूप आहेत. मात्र, या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.