गडचिरोली- अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन दोन दिवस गावात यशस्वी लॉकडाऊन करून संभावित संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या. यामध्ये त्या संशयित रुग्णाचे अहवाल गुरुवारी रात्री निगेटिव्ह आल्याने गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त कायम राहिला.
गडचिरोलीतील संशयित रुग्ण निघाला 'निगेटिव्ह'; प्रशासनाची धावपळ 'पॉझिटिव्ह' संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली येथील संशयित रुग्णाबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रशासनाकडून संशयित रुग्ण आढळल्यानंतर तत्काळ पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली. याच धर्तीवर नागेपल्ली गावात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून संपूर्ण संचारबंदी करण्यात आली. गावात येणाऱ्या प्रत्येक सीमा बंद करण्यात आल्या.
गावातील व्यक्ती बाहेर नाही आणि बाहेरील व्यक्ती गावात नाही, याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. संबंधित संशयित रुग्णाला भेटलेल्या व त्याच्या आजूबाजूच्या 50 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. अहवालाची वाट न पाहता संशयित रुग्णाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने याबाबत उचित काळजी घेण्यात आली. गावात इतर ठिकाणी संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने ही पावले उचलत उपाययोजना व प्रतिबंधात्मक हालचाली राबविल्या. याबाबत सर्व स्तरावर पडताळणी केली यामध्ये घरोघरी सर्वे, आरोग्यविषयक तपासण्या, संचारबंदी, निर्जंतुकीकरण, संस्थात्मक व होम क्वारंटाईन, लॉकडाऊन दरम्यान राबवायचा इतर उपाययोजना व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप या बाबी यशस्वी राबविल्या.
गडचिरोलीतील संशयित रुग्ण निघाला 'निगेटिव्ह'; प्रशासनाची धावपळ 'पॉझिटिव्ह' जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सहकार्याने या प्रक्रियेला गती मिळाली. यामध्ये आशा, आरोग्य सेवक, तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी गावात आरोग्य विषयक कामांना गती दिली. कोणत्याही प्रकारे संभावित संसर्ग होणार नाही याची दखल घेण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून मोठया प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.
गावात सतत पेट्रोलिंग करून लोकांना आवश्यक माहिती देण्यात आली. नागेपल्ली परिसरातील सर्व पेट्रोल पंप, सेवासदन दवाखाने, बँक, दुकाने प्रामुख्याने दोन दिवस बंद ठेवण्यात आली. संशयित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव नागेपल्ली व अहेरी तालुक्यातील इतर ठिकाणचे मिळून ५ पर्यवेक्षक, ३ वैद्याकीय अधिकारी ४६ कर्मचारी यांनी २३ टीम करून नागेपल्ली येथे रुग्ण शोध मोहीम राबवली. यावेळी त्यांना आवश्यक मास्क, हातमोजे, सॅनिटायझर अशा सुविधा देण्यात आल्या. त्यांना राहण्याची व्यवस्था एकलव्य वसतीगृहात करण्यात आली. सुरूवातीला त्यांना या प्रक्रियेचे तत्काळ प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांना प्रवासासाठी एसटी महामंडळाची बस देऊन तिचे दोनवेळा निर्जंतुकीकरणही केले.
संभावित संसर्ग टाळण्यासाठी गावातील १०९८ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले. ४१३३ सदस्यांची तपासणी पूर्ण केली. यामध्ये त्यांना 3 लोकांना ताप आणि खोकला आढळून आला. तर एक वर्षाच्या आतील 60 मुलांचीही तपासणी करण्यात आली. 18 गरोदर महिलांनाही यावेळी आवश्यक उपचार करण्यात आले.