गडचिरोली -आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील लोकसंख्या सतराशेच्या घरात असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केवळ 14 जणांनी मतदान केले. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
पाथरगोटा गावात केवळ 8 पुरुष आणि सहा महिलांनी मतदान केले. गावात दोन मतदान केंद्र होते. यामध्ये एका बुथवर 19 वर 2 पुरुष आणि 1 स्त्री तर दुसऱ्या बुथवर 20 वर 6 पुरुष आणि 5 स्त्रियांनी मतदान केले. विशेष म्हणजे, यात केवळ उमेदवार आणि त्यांचे बुथ प्रतिनिधी यांचा समावेश होता.
स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव 30 वर्षांपासून धूळखात-
आरमोरी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर पाथरगोटा गाव आहे. मागील ३० वर्षांपासून पाथरगोटा गावाने गट ग्रामपंचायत असलेल्या पळसगाव गट ग्रामपंचायतपासून वेगळी ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी करण्य़ात येत आहे. गामस्थांनी अनेक आंदोलन व निवेदनातून सरकारला ग्रामपंचायत वेगळी करण्याची मागणी केली. ग्रामसभातून अनेक निवेदन शासनस्तरावर पाठविण्यात आले. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत वेगळा करण्याचा प्रस्ताव सरकारी दरबारी धूळखात पडला आहे.
हेही वाचा-पुणे : कुसेगाव येथे मतदान प्रक्रियेला गालबोट; दोन गटात किरकोळ हाणामारी
पळसगावाची हुकूमशाही चालत असल्याचा आरोप-
मागील लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि टाळेबंदी अगोदर जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी मागणी केली. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र शासन, प्रशासन याकडे दुर्लक्ष केले. पाथरगोटा गावाची लोकसंख्या १७०० च्या घरात असून ग्रामपंचायत पळसगाव पेक्षाही गावाची लोकसंख्या जास्त आहे. मात्र, असे असूनही ग्रामपंचायत पेसाअंतर्गत येत असल्याने बहुसंख्य इतर मागासवर्गीय मतदार असताना सरपंचपदासाठी नेहमीच निराशा झाली आहे. त्यामुळे सरपंच आणि इतर सदस्य हे पळसगाव येथील असल्याने ग्रामपंचायतमध्ये फक्त पळसगावाची हुकूमशाही चालते. सरकारस्तरावरील संपूर्ण विकास निधी हा पळसगावात खर्च होत आहे. पाथरगोटा गाव विकासकामापासून कोसो दूर असल्याचे ग्रामस्थ संतोष प्रधान यांनी म्हटले आहे.