गडचिरोली - येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र, परीक्षेदरम्यान सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने सकाळी 9 वाजताचा पेपर रद्द करत दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला. तरीही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता सर्वच परीक्षा पाच दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 12 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा अडचणींविना पार पाडण्याचे चॅलेंज विद्यापीठासमोर आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा पॅटर्न राबविण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना ग्रुप ऑनलाईन परिक्षा द्यायची होती. तर, 11 ठिकाणी ऑफलाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. सोमवारी सकाळी नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान पहिला पेपर होता. मात्र, पहिल्या ऑनलाईन पेपरला अनेक ठिकाणी इंटरनेटमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर लॉगिन करता आले नाही.