गडचिरोली- एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात नक्षल व सी-60 जवानांमध्ये शुक्रवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यास जवानांना यश आले. शनिवारी (दि. 4 जुलै) मृत नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलमचा कमांडर सोमा उर्फ शंकर असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. ठार झालेल्या शंकरवर गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे असल्याने शासनाने त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या येलदडमी जंगल परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोनी घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा शिबीर उध्वस्त केले. या जंगल परिसरात सी-60 कमांडोंनी शोधमोहीम राबविली असता एक हत्यार, 2 प्रेशर कुकर, वायर बंडल, 2 वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, 20 पिटु असा मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त आढळून आले. ही चकमक सुमारे अर्धा तास चालली होती. चकमकीनंतर सी-60 कमांडोचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.