महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंतरजातीय विवाह केलेल्या 160 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप - आंतरजातीय विवाह सानुग्रह अनुदान

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १६० जोडप्यांना प्राप्त निधीनुसार रू. ७९.६५ लक्ष वितरित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे वाढलेल्या अडचणीच्या काळात अनुदान प्राप्त झाल्यामुळे विवाहित जोडप्यांनी आनंद व्यक्त केला. मागील 3 वर्षांपासून हे अनुदान देण्यात आले नव्हते.

couples got grant for inter caste  marriage
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक अनुदान

By

Published : Aug 9, 2020, 11:19 AM IST

गडचिरोली- आंतरजातीय विवाह करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील १६० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप जिल्हा परिषदेत करण्यात आले. कोरोना संकट सुरु असताना अनुदान मिळाल्याने जोडप्यांनी आनंद व्यक्त केला.

सद्यस्थितीत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, गडचिरोली कार्यालयात २४५ प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी १६० प्रस्तावावर प्राप्त निधीनुसार रू. ७९.६५ लक्ष खर्च करण्यात आले आहेत. कोरोनामुळे वाढलेल्या अडचणीच्या काळात अनुदान प्राप्त झाल्यामुळे विवाहित जोडप्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या विर बाबुराव शेडमाके सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, समाज कल्याण सभापती रंजीता कोडापे, कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प. सदस्य गीता कुमार, लता पुंगाटी, अनिल केरामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शासन निर्णय १२ जानेवारी १९९६ अन्वये राज्यातील जातीयता आणि भेदाभेद कमी करण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देणे ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले नव्हते.

१ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शीख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जोडप्यांना या योजनेंतर्गत ५० हजार रू. अर्थसहाय्य देण्यात येते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येते. जानेवारी २०१० पर्यंत रूपये १५ हजार अर्थसहाय्य देण्यात येत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details