गडचिरोली- चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तिसऱ्या दिवशीही तुटलेला असून गेल्या 24 तासात 37.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, कठाणी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तिसऱ्या दिवशीही भामरागडचा संपर्क तुटलेलाच; 24 तासात 37.4 मिलिमीटर पावसाची नोंद - rain
चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, कठाणी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे भामरागडसह अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलेला होता. अनेक मुख्य मार्गावर झाडे कोसळली. त्यामुळे या तालुक्यातील भ्रमणध्वनी व वीज सेवाही गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने अनेक ठिकाणचा पूर ओसरला. मात्र, छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात पाऊस झाल्याने पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने प्रशासनाने भामरागड मधील 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. सॅटेलाईट व वायरलेसच्या माध्यमातून प्रशासनाकडून भामरागडमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ही स्थिती आजही कायम आहे.