गडचिरोली- दक्षिण गडचिरोली भागात ७ दिवसा अगोदर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पुराचा सर्वात जास्त फटका भामरागड शहरासह तालुक्याला बसला होता. आता प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, १२८ गावांपैकी अर्ध्या पेक्षा अधिक गावांमध्ये जाण्यासाठी रस्तेच नाही. त्यामुळे, पंचनाम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आदींना गावांमध्ये पोहोचण्यासाठी नाल्यांमधून वाट काढावी लागत आहे.
नुकसानग्रस्तांचे पंचनामे करणे आवश्यक असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्ट पर्यंत तब्बल ७ ते ८ वेळा भामरागडसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. यात तालुक्यातील अनेक गावांना नुकसान झाले. नागरिकांची धानशेती नाहीशी झाली, तसेच पाळीव प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला. यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे, गावकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रशासनाकडून पंचेनामा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.