गडचिरोली - जिल्हा हा पारंपरिक धान उत्पादक जिल्हा. मात्र जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाच्या महापुराने यंदा कहर केला. महापुरात धानशेती उद्ध्वस्त झाली. शेतकरी हताश होते. मात्र हताश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने करडई तेलबिया पिकाची निवड करत नवा पर्याय दिला. हा पर्याय शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरला आहे.
आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राने पुरविले बियाणे व कृषी तंत्र सहाय्य
यंदा विदर्भातील काही जिल्ह्यात निसर्गाच्या कोपापेक्षा गोसीखुर्द धरणाच्या मानवनिर्मित महापुराने होते नव्हते ते वाहून नेले. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला. उभे धानपीक वाहून गेले अथवा सडले. यानंतर या शेतकऱ्यांपुढे हंगाम कसा निभावा असे संकट उभे ठाकले. कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि आत्मा यांनी संयुक्तपणे अशा शेतकऱ्यांसाठी करडई तेल बिया पिक सुचविले. यासाठी सुमारे दोनशे शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात आले. सोबतच कृषी तंत्र सहाय्य देखील पुरविण्यात आले. परिणामी या शेतकऱ्यांच्या शेतावर करडईचे उत्तम पीक आले असून यामुळे शेतकऱ्यांना तेलबिया पिकाचे नवे आकाश खुले झाले आहे.