गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयाची मंगळवारी (दि. 9 जून) रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यामध्ये कार्यालय जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
त्यासोबतच तिथे असलेल्या दोन वनरक्षकाला ही बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्याकडे असलेले मोबाईल नक्षलवाद्यांनी घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा नक्षलवादी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय आहे. मंगळवारी (दि. 9 जून) रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने नक्षली या परिसरात जमा झाले. त्यानंतर कार्यालयात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर नक्षली वन कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेऊन पसार झाले. या भागात मोबाईल सेवा खंडित असल्याने घटनेची माहिती मिळण्यास विलंब झाला. घटना लक्षात येताच वरिष्ठ पोलीस, वन अधिकाऱ्यांनी दखल घेत आसपासच्या भागातील पोलीस ठाण्यांना अलर्ट केले आहे.
हेही वाचा -सिरोंच्यातील कंटेन्मेंट वार्डातील नागरिकांची दैंनदिन गरजांसाठी दैना, जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची प्रशासनाकडे मागणी