गडचिरोली -भामरागडमधील मडवेली जंगल परिसरात पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा हा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश आले आहे.
हेही वाचा -जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही - राजेश टोपे
- नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केला होता गोळीबार -
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यावेळी जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.
- आयईडी व कुकर बॉम्ब पोलिसांनी केले नष्ट -
दरम्यान, 21 सप्टेबर रोजी होत असलेल्या विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
- जंगल परिसरात शोध अभियान -
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले. यावेळी घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठया प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले आहेत. जवानांनी नक्षलविरोधात महत्वपूर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांचा शिबीर उधळून लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी नक्षलविरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस दबंग नेता, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील