गडचिरोली - जंगलामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवत असताना २०१९ मध्ये विशेष अभियान पथकातील पोलीस जवानांवर अंदाधुंद गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याप्रकरणी महिला नक्षल आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पार्वती उर्फ सुशीला शंकर मडावी (वय 28 वर्ष राहणार मढवेली ता. भामरागड) असे तिचे नाव आहे.
चकमकीत साहित्य जप्त-
20 मे 2019 रोजी विशेष अभियान पथकातील पोलीस जवान कोपर्शी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या 60 ते 70 बंदूकधारी नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करून पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले होते. त्यावेळी घटनास्थळावरून ब्लास्टिंगचे साहित्य, प्रेशर कुकर, डेटोनेटर, वायर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.