गडचिरोली - 'आमचा हसता- खेळता परिवार नक्षलवाद्यांमुळे उद्धवस्त झाला'. नक्षलवाद्यांमध्ये सहभागी झालेल्या सृजनक्काला अनेकदा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केले. मात्र, तीने आमचे ऐकले नाही. सृजनक्काने आमचे ऐकले असते तर आज ती जिवंत असती, अशी खंत चार दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेली महिला नक्षली सृजनक्काच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
'मी, सृजनक्का सर्व भावंडे गुण्या-गोविंदाने राहत होतो. तेव्हा नक्षली गावात येऊन जेवण बनवून आणण्यासाठी आमच्यावर दबाव आणत असत. सृजनक्का त्यांना जेवण द्यायला जात असे आणि एक दिवस तिला भुलथापा देवून कायमचे सोबत घेऊन गेले. यामुळे आमचा सुखी परिवार दुः खाच्या खाईत लोटला गेला. तिला मी, तसेच वडील चैतू अर्का आत्मसमर्पण करण्यासाठी नेहमीच आग्रह करत होतो. पण तिने दुर्लक्ष केले. तिने आमचे ऐकले असते तर कदाचित ती आज सुखी समाधानाचे जीवन जगत असती, अशी खंत सृजनक्काची बहीण पोटरी डोल पल्लो हिने बोलून दाखवली. नक्षलवाद्यांंच्या भुलथापांना बळी पडून जे आदिवासी तरुण- तरुणी नक्षलींसोबत गेले आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहनही तिने यावेळी केले.