गडचिरोली - नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेवरील अबुजमाड जंगल परिसरात घुसून 2 नक्षलवाद्यांना शनिवारी गडचिरोली पोलिसांनी ठार केले. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
गडचिरोलीत नक्षलवादी-पोलीस चकमक; 2 नक्षलवादी ठार भामरागड तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. या परिसरात नक्षलवाद्यांचा कॅम्प लागल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या परिसराला घेरण्यात आले. यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -खळबळजनक! हैदराबादमध्ये पुन्हा आढळला महिलेचा जळालेला मृतदेह
या चकमकीत नक्षलवाद्यांचा संपूर्ण कॅम्प पोलिसांनी उध्वस्त केला आहे. यानंतर घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. 2 डिसेंबर पासून नक्षलवाद्यांचा सप्ताह सुरू होत असल्याने 2 दिवसांपासून नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी बॅनर आणि पत्रके टाकून नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांकडून शोधमोहिम सुरू असताना पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे.
हेही वाचा -कांदा फक्त 35 रुपये किलो म्हटल्यावर उडाली झुंबड, खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा