गडचिरोली- भामरागड तालुक्यातील कुंडुरवाहीच्या जंगलात आज सकाळी पोलीसांचे एक पथक अभियानावर होते. त्यावेळी नक्षल्यवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणत पोलीस पथकावर हल्ला केला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात दोन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याने या दोन्ही नक्षलवाद्यांवर २० लाख रुपयांचे बक्षीस होते.
गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवान व अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलीस जवान संयुक्तरित्या भामरागड तालुक्यातील जंगलात नक्षल मोहीम राबवत होते. सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास गुंडूर्वाही आणि पुलनार गावाच्या पहाडीवरील झरणाजवळ नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये पोलीस दलाला कुठलीही हानी पोहोचली नाही. या परिसरात शोधमोहीम राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या चकमकीतनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.