गडचिरोली- जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धुडगूस कायम असून त्यांनी पुन्हा एकदा बॅनरबाजी करत 19 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. तशा आशयाचे बॅनर आज भामरागड तालुक्यातील अनेक भागात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर पोलिसांच्या सी-60 पथकाचा उल्लेख आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची पुन्हा बॅनरबाजी, 19 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन
जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावले आहेत. या फलकामधून नक्षल्यांनी 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.
भामरागड तालुक्यात 27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर रामको व दलम सदस्य शिल्पा धुर्वा या दोघींना पोलिसांनी ठार केले होते. पोलिसांनी ही खोटी चकमक दाखवून त्यांना ठार केले, असा आरोप करत या घटनेचा नागरिकांनी निषेध करावा, पोलिसांचा विरोध करावा, भाकपा माओवादी भामरागड एरिया कमिटी, असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
लाल रंगाचे हे बॅनर एटापल्ली तालुक्यातील गुरूपली मार्गावर तसेच आलापल्ली-एट्टापली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर आढळून आले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवानांना वीरमरण आले होते. तर या घटनेनंतर 3 दिवस 3 ठिकाणी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तिघांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तर काही ठिकाणी रस्ता कामावरील वाहनेही पेटवून दिले होती. त्यामुळे या महिन्यात नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच असून नक्षल बंददरम्यान मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.