गडचिरोली- सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातून नामांकन केलेल्या १५५ शिक्षकांपैकी ४५ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यात गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे या दोन शिक्षकांचा महाराष्ट्रातून समावेश आहे.
वेगवेगळ्या आनंददायी उपक्रमांची आखणी-
सिरोंचा हे तालुकास्थळ गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दोनशे किलोमीटर अंतरावर आणि असरअली हे गाव सिरोंचा तालुकास्थळापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर ते वसले आहे. असरअली गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. खुर्शिद शेख हे २०१३ मध्ये त्या शाळेत रुजू झाले, तेव्हा शाळेची पटसंख्या ४५ होती. शाळा जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होती. शाळेच्या या स्थितीची शेख यांनी स्वत:च कारणमीमांसा करण्यास सुरुवात केली.
पाठ्यपुस्तक आणि स्थानिक भाषेचा समन्वय-
राज्य शासनाची पुस्तके मराठी भाषेतून आहेत आणि असरअली परिसरातील नागरिकांची भाषा तेलगू आहे. भाषा हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग, शेख यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. शाळेत आनंदबाग तयार केली. विज्ञान प्रयोगशाळा उघडली. व्हर्च्युअल क्लासरुमही उघडली. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ग्रंथालय सुरु केलं. आज हे ग्रंथालय ३ हजार पुस्तकांनी सुसज्ज आहे.