गडचिरोली - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन पुरस्कार -
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून खुर्शिद शेख आणि उमेश खोसे या दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुर्शिद शेख यांना तर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमेश खोसे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.