गडचिरोली - राज्याचे सार्वजनिक आरोग्य, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यात शासकीय दवाखान्यांच्या फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन केले. ते रविवारी गडचिरोली येथे आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील दु:खद घटनेमुळे शासनाने राज्यातील शासकीय दवाखान्यांचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश दिले. सदर काम तातडीने पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवादही साधला.
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर गडचिरोली शासकीय रुग्णालयात ज्या शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट झाले नाही, त्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फायर ऑडीट होणे बाकी आहे अशा ठिकाणी ऑडीट प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आदेश दिले जात आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देणेबरोबरच पुन्हा अशा दुर्देवी घटना घडू नयेत, म्हणून त्यावर उपाययोजनाही राबविल्या जाव्यात, असे आदेशही देण्यात येत आहेत असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा -भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सर्व रुग्णालयांचे 'फायर ऑडीट' होणार
गडचिरोली मधील आरोग्य सुविधा चांगल्या
नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी राज्यमंत्री यांनी केली. त्याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्था, लाईट, ऑक्सिजन व्यवस्था व इतर यंत्र सामुग्री चांगली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर विभागांचीही पाहणी केली. तसेच नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर लॅबचीही पाहणी केली.
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर गडचिरोली शासकीय रुग्णालयात आरोग्य विभागातील कामकाजाचा आढावा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, मलेरीया साथ, रिक्त पदे, इतर अडीअडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण येत असतात त्यामूळे त्या ठिकाणचे फायर ऑडीट तातडीने करुन घेणे व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच फायर अलार्म बाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मध्ये प्रस्तावित आहे त्यासाठी प्रशासन तातडीने निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर गडचिरोली शासकीय रुग्णालयात रिक्त पदे लवकरच भरणार आरोग्य विभागातील जिल्ह्यात असलेली 25 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा भरा असा आदेश दिला आहे. त्यानुसार, गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पदभरती वेळेत होईल. यामध्ये आरक्षण हा मुद्दा राज्यभर सद्या सुरु आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -भंडारा : रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश