गडचिरोली- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त दहा दिवस यात्रा भरते. गेल्या तीन वर्षांपासून ही यात्रा दारू, खर्रा आणि तंबाखूमुक्त झाली आहे. या उपक्रमामागे ग्रामपंचायत, मंदिर देवस्थान समिती, मुक्तिपथ अभियान आणि पोलीस प्रशासनाचे योगदान असून व्यसनमुक्त यात्रेचे हे चौथे वर्ष आहे.
मार्कंडादेव यात्रेत विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी यात्रेत येताना भाविक खर्रा, तंबाखूचे सेवन करून तर कुणी मद्यप्राशन करून यायचे. त्यामुळे, यात्रेत भांडणे, अस्वच्छता असे प्रकार तर दिसायचेच पण यात्रेचे पावित्र्यही धोक्यात यायचे. हा प्रकार थांबवून यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१७ पासून मुक्तिपथने जनजागृती अभियान सुरू केले. याला मार्कंडादेव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मंदिर समिती व पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे, मार्कंडादेव यात्रा सलग तीन वर्षे खर्रा व तंबाखूमुक्त राहिली.