महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत रुग्णालय परिचारिकेवर बलात्कार; आरोपीला अटक - गडचिरोलीत महिलेवर बलात्कार

देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला तिच्या परिचयातीलच नराधमाने घरी सोडण्याच्या निमीत्ताने गाडीवर बसवून तिच्यावर बलात्कार केला. राजेश सुरेश कांबळी (३०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बलात्कार
PHYSICAL ABUSE AGAINST NURSE

By

Published : Dec 9, 2019, 3:29 PM IST

गडचिरोली- हैदराबाद येथील बलात्कार प्रकरण देशात गाजत असताना अशीच धक्कादायक घटना जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) शहरात घडली. देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेश सुरेश कांबळी (३०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित युवती ही देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. दुपारपाळीतील काम आटोपून ती रात्री साडेसात-आठ वाजताच्या सुमारास बसने आपल्या गावी जाते. रविवारी काम आटोपल्यानंतर ती देसाईगंज येथील बसस्थानकावर पोहोचली. परंतु, बराच वेळ वाट बघूनही बस आली नाही. एवढ्यात तेथे तिच्या ओळखीचा राजेश कांबळी हा युवक मोटारसायकलवर आला. रात्र झाल्याने गावी जायचे कसे, म्हणून तिने राजेशला मोटारसायकलवर बसवून नेण्याची विनंती केली.

आरोपी राजेशने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत ती बेशुद्ध पडून त्यात तिचा मृत्यू झाला असे आरोपीला वाटले. म्हणून राजेश तिचा मोबाईल व अन्य सामान घेऊन पसार झाला.

दरम्यान, गावाकडे येणारी बस व अन्य वाहने आल्यावरही मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी पीडितेच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, पंधरा-वीस वेळा प्रयत्न करुनही मुलीने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी आपल्या मुलासह मोटारसायकलने देसाईगंज गाठले. जेथे ती काम करत होती त्या रुग्णालयातही विचारपूस केली. परंतु, ती बऱ्याच वेळापूर्वी रुग्णालयातून गेल्याचे सांगण्यात आले.

पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कशीबशी शेजारच्या राईस मिलमध्ये गेली. तेथे उपस्थितांना तिने घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचवली. त्यानंतर वडील व भाऊ यांनी राईस मिलमध्ये येऊन तिला घरी नेले. रात्री उशिरा देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आज दुपारी आरोपी राजेश कांबळी यास अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details