महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुट्ट्यांमध्येही विद्यार्थांना शिक्षण; लोक बिरादरी आश्रमशाळेचा उपक्रम - गडचिरोली न्यूज

यावर्षी कोविड-19 मुळे जग हादरुन गेले आहे. सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची द्वितीय सत्रात परीक्षा न घेता सुट्या जाहीर करण्यात आल्या. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार, याचीही शाश्वती नाही.

lok-biradari-ashram-school-teaching-student-in-holidays-in-gadchiroli
लोक बिरादरी आश्रमशाळेचा उपक्रम

By

Published : Jun 13, 2020, 6:10 PM IST

गडचिरोली- भामरागड तालुक्यातील डॉ.आमटे दाम्पत्याच्या लोक बिरादरी आश्रमशाळा यावर्षी पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. 'शिक्षण तुमच्या दारी' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोक बिरादरी आश्रमशाळेचा उपक्रम

यावर्षी कोविड-19 मुळे जग हादरुन गेले आहे. सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची द्वितीय सत्रात परीक्षा न घेता सुट्या जाहीर करण्यात आल्या. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार, याचीही शाश्वती नाही. चार ते पाच महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची लिंक तुटू नये, शिक्षण ही प्रक्रिया अविरत सुरू रहावी, यासाठी लोक बिरादरी आश्रमशाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे.

लॉकडाऊनमुळे येथील शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वगावी जाऊ शकलेले नाही. त्यामुळे इयत्ता 1 ली ते 9 वी आणि इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग प्रत्यक्ष त्यांचे गावी जाऊन घ्यायचे ठरले. त्यासाठी 5 केंद्रे निवडण्यात आली. तेंदुपत्यांचा हंगाम संपताच आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शिकवणी वर्गाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर परिसरातील 2 ते 3 किमी अंतरावरुन गावातील विद्यार्थी पालकांसोबत येतात. एका केंद्रावर दोन शिक्षक याप्रमाणे शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे पालन करीत, फिजिकल अंतर राखून, मास्क लावून 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे गावातील मोकळ्या जागेत झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत. हे शिकवणी वर्ग शाळा सुरू होईपर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाला 95 ते 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतात हे विशेष!

ABOUT THE AUTHOR

...view details