गडचिरोली- 'कोरोना व्हायरस'ने देश लॉकडाऊन झाला आहे. त्यातच लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढल्याने हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दंडकारण्यातील आदिवासी बांधवांवरही उपासमारीची वेळ आली. मात्र, उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशिक्षित असलेले आदिवासी सुशिक्षितपेक्षाही समजूतदारपणा दाखवत आहेत. लॉकडाऊनमुळे एक प्रकारे आदिवासींची पारंपारिक जीवन जगण्याची पद्धतच बदलल्याचे चित्र दंडकारण्यात पाहायला मिळत आहे. यासंर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.
मासोळ्या तसेच लाल मुंग्या वाळवून भाजी...
गडचिरोलीतील भामरागडच्या जंगलामध्ये राहणाऱ्या कोईनगुडा गावातील आदिवासी नागरिकांना शहराशी फारशी ओळख नाही. मात्र, आधुनिकतेच्या युगात आदिवासी नागरिकही विकासाच्या प्रवाहात येऊ लागले आहेत. शहरी भागातील राहणीमान आत्मसात करू लागले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आदिवासींवर पुन्हा कंदमुळे खाण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प, दुकान बंद आहेत. त्यामुळे दंडकारण्यातील भागांमध्ये भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू, साहित्य पोहोचण्यास विलंब होत आहे. परिणामी जे गावात उपलब्ध होते किंवा जे घरात साठवून आहे. तेच खाण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. काही आदिवासींनी मासोळ्या तसेच लाल मुंग्या वाळवून भाजी म्हणून उपयोग करीत आहेत.
मोहफुलाची दारुही काढता येत नाही...
दंडकारण्यातील आदिवासींसाठी रोजगार हमी योजना तसेच तेंदुपत्ता संकलन हे प्रमुख रोजगाराचे साधन आहे. मात्र, सध्यातरी रोजगार हमी योजनेचे काम सुरू नाही. तर पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला तेंदूपत्ता संकलन लिलाव प्रक्रियेमुळे धूसर दिसून येत आहे. सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम असल्याने अनेक जण आपल्या मुलाबाळांसह दिवसभर घराबाहेर असतात. सायंकाळीच गावात परततात. मोहफुलापासून मद्य तयार करुन काही जण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई असल्याने पंडम (आदिवासी पूजा) केल्याशिवाय मोहफुलाची दारुही काढता येत नाही.