गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी ९ एप्रिल म्हणजे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार असून आता गुप्त बैठकीवर उमेदवार व कार्यकर्त्यांचा भर राहणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १८ मार्चपासून नामांकन भरण्याला सुरुवात झाली. तर 28 मार्चपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. गेली ८ दिवस जिल्हाभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची चामोर्शी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागभीड, गांगलवाडी, अहेरी, राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची गडचिरोली, कोरची तसेच पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देसाईगंज (वडसा), चामोर्शी येथे, खासदार राजीव सातव यांची कुरखेडा, धानोरा, कोरेगाव येथे सभा तर विधिमंडळ उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याही अनेक सभा झाल्या. तर वंचित बहुजन आघाडीने चामोर्शी येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सभा घेतली.