गडचिरोली -मनात जिद्द असेल तर आपोआप परिस्थितीवर मात करता येते हे दुर्गम भागातील माडिया जमातीच्या कोमलने दाखवून दिले. गडचिरोलीपासून जवळपास ३०० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम अशा झिंगानूर गावतील कोमलने मडावीने नुकतेच एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती माडिया समाजातील पहिली एमबीबीएस महिला डॉक्टर बनली आहे. ध्येयाने पछाडलेल्या कोमलची जिद्द निश्चितच समाजाला प्रेरणा देणारी आहे.
झिंगानूर हे आदिवासी आणि अविकसित गाव असून सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर वसले आहे. कोमलने याच गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा येथे घेतले. घरची परिस्थिती बिकट असतानाही पुढील शिक्षणासाठी तिने सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालय गाठले. ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण सिरोंचा येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले.
मुलींनी आई-वडिलांच्या कष्टाचे सोनं केलं -
कोमलची आई आरोग्य सेविका, तर वडील शेती करतात. आई आरोग्य विभागात कार्यरत असल्यामुळे आपल्या मुलींना डॉक्टर बनावे अशी कोमलची आई श्यामला यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला साथ मिळाली ती कोमलच्या वडिलांची. कोमलच्या वडिलांनी तानी चित्रपट पाहिल्यामुळे आपल्या मुलींनी शिकून काहीतरी बनावे, असे त्यांना वाटत होते. एका रिक्षावाल्याची मुलगी कलेक्टर बनू शकते, तुम्ही चांगल्या पदावर का जाऊ शकत नाही? ही प्रेरणा त्यांनी आपल्या मुलींना दिली. शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा हा विशाल दृष्टीकोन मुलींना प्रेरणादायी ठरला. त्यांनी आनंदाने आपल्या मुलींसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. कोमलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिला नागपूरला पाठवले. नागपुरातील कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय येथे ११ वी, १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.बी.बी.एम.ची प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये कोमल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिला वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे प्रवेश मिळाला. आता तिने ६१ टक्के घेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे आणि माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. आता मुलीने पोस्ट ग्रॅज्युएशन करावे, अशी इच्छा तिच्या आईने बोलून दाखवली.