महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसने ६५ वर्ष उल्लू बनवलं; मुख्यमंत्री फडणवीसांची घणाघाती टीका - fadnavis

काँग्रेसचा जाहीरनामा आहे की, जैश ए महम्मद'चा जाहीरनामा हेच कळत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 8, 2019, 7:15 PM IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा खरपूस समाचार घेताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस काय गरिबी हटवणार. तीच ती आश्वासने देऊन काँग्रेस नागरिकांना उल्लू बनवत आहे. काँग्रेसचे सर्व नेते खोटे बोलण्यात उस्ताद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

२६/११ च्या मुंबई बाँबस्फोटात आमच्या पोलिसांना वीरमरण आले. मात्र, यावेळी काँग्रेस सरकारने कुठलेच पाऊल उचलले नाही. केवळ निषेध करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. मात्र, पुलवामा हल्ला घडल्यानंतर भाजप सरकारने जशास तसे उत्तर देत एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. मात्र, या एअर स्ट्राईकचे दोन जण पुरावे मागत आहेत. एक म्हणजे पाकिस्तान तर दुसरा काँग्रेस. या दोघांनाही पुरावे द्यावे लागणार, हे माहिती असते तर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटमध्ये बसवले असते, असेही ते म्हणाले. काँग्रेसचा जाहीरनामा शुद्ध फसवणूक असून 'काँग्रेसचा जाहीरनामा आहे की, जैश ए महम्मद'चा जाहीरनामा, अशी घणाघाती टीका करून मतांच्या लांगुलचालनकरता काँग्रेस कोणत्याही थराला पोहोचू शकतो, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात जनधन योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरिबांच्या खात्यावर ८० कोटी रुपये जमा केले. गडचिरोलीतील २०० गावात आम्ही वीज पोहोचवली. गडचिरोलीतील खनिज बाहेर जाऊ देणार नाही. उद्योग गडचिरोली जिल्ह्यातच उभारणार. बजेटमध्ये ९ टक्के निधी आदिवासींसाठी आम्ही राखीव ठेवले. आदिवासींना नामांकित शाळेत प्रवेश दिला. २५ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. गेल्या ४ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक निधी दिला, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details