महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : ग्रामसभेच्या पुढाकाराने गडचिरोलीत गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा सुरू - गोंडी भाषेतून शिक्षण देणारी शाळा

गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. स्वतंत्र लिपी आणि व्याकरण असलेली ही भाषा आता स्वतंत्रपणे शिकवण्याची ही घटना ऐतिहासिक ठरली आहे.

first-gondi-language-school-was-started-in-gadchiroli
first-gondi-language-school-was-started-in-gadchiroli

By

Published : Mar 21, 2021, 5:26 PM IST

गडचिरोली - गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. स्वतंत्र लिपी आणि व्याकरण असलेली ही भाषा आता स्वतंत्रपणे शिकवण्याची ही घटना ऐतिहासिक ठरली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात अतिदुर्गम अशा मोहगाव येथे नवी शैक्षणिक क्रांती घडली आहे.

अतिदुर्गम गावच्या ग्रामसभेचा चमत्कार -

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची मायबोली गोंडी भाषेला मुख्य प्रवाहात आणण्याची ही क्रांती आहे. ही क्रांती घडवण्यासाठी कुणी शिक्षणमहर्षी येथे आला नाही, तर मागास म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एका अतिदुर्गम गावच्या ग्रामसभेने हा चमत्कार करून दाखवला. ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा मोहगाव इथं सुरू झाली आहे. पहिला वर्ग इथं सुरू झाला असून, त्यात 30 विद्यार्थी गोंडी भाषेचे धडे गिरवत आहेत. गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारं केंद्र आपल्या गावात असावं, असा निर्धार गावानं केला आणि आदिवासींचे दैवत असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या साक्षीनं ही शाळा सुरू केली.

गडचिरोलीत गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा सुरू
30 चिमुकल्यांनी उपस्थिती उत्साह वाढवणारी-


छत्तीसगडच्या सीमेवर आणि नक्षलप्रभावित असलेल्या या भागात शिक्षणाची ही नवी पहाट आदिवासींच्या नव्या पिढीला भाषेने अलंकृत करणार आहे. विशेष म्हणजे गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. मात्र तरीही गोंडी शाळेत 30 चिमुकल्यांनी उपस्थिती उत्साह वाढवणारी आहे. सध्या या शाळेत दोन शिक्षक आहेत. या शिक्षकांचा पेहरावही खास पारंपरिक आहे. खडू-फळ्याऐवजी पांढरा बोर्ड आणि पेन वापरून शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. सध्या प्राथमिक शिक्षण दिले जात असल्याने अंक आणि बाराखडीची माहिती दिली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना गोंडी भाषेची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली.
हे ही वाचा - कोरोनाचा हॉटस्पॉट ! मालेगावातील चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुफान गर्दी
छत्तीसगडमधील सरोना येथून शैक्षणिक साहित्य-


छत्तीसगडमधील सरोना येथे देशातील पहिली गोंडी भाषा शाळा सुरू झाली. आता याच ठिकाणाहून छापील साहित्य आणलं जात आहे. सरोना इथंच येत्या काही दिवसात हे शिक्षक प्रशिक्षणाला जाणार आहेत. भविष्यात दहावीपर्यंत ही शाळा नेण्याचा ग्रामसभेचा निश्चय आहे. लोकसंख्या सर्वाधिक असूनही आपली मातृभाषा दुर्लक्षित आहे. ती हळूहळू नामशेष होत चालली. त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं शिक्षक सांगतात.

राज्य शासनानं मान्यता द्यावी म्हणून राज्यपालांकडे प्रस्ताव-

ग्रामसभेनं विद्यार्थ्यांना गणवेश, जोडे आणि लेखन साहित्य दिलं असून, दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही केली आहे. आता ही शाळा ग्रामसभेनं आपल्या संवैधानिक अधिकारात सुरू केली असली तरी राज्य शासनानं याला मान्यता द्यावी, यासाठी राज्यपाल आणि आदिवासी विकास विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. पुढे या शाळेचा विस्तार करून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची ग्रामसभेची योजना आहे.
हे ही वाचा - अखेर दिवस उजाडला..! कोरोनाचे नियम पाळत एमपीएससीच्या परीक्षेला सुरुवात
शाळेमुळे गोंडी भाषेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित -

शाळेत येणारी मुलं आता गोंडी भाषेची बाराखडी शिकत आहेत. त्यांच्याकडून कविता पठणही करून घेतलं जात आहे. हे शिक्षण सध्या बाल्यावस्थेत असल्यानं ही चिमुकली मुलं जेवढं विचारलं, तेवढं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. अमृताशी पैजा जिंकणारी आपली मराठी. पण राज्यात विविध ठिकाणी विविध भाषा कशा बोलल्या जातात, याचं गोंडी भाषा हे एक उत्तम उदाहरण आहे. ही भाषा केवळ बोललीच जात नाही, तर त्याची लिपी आणि व्याकरणही अस्तित्वात आहे. त्यामुळं, या भाषेची ही पहिली शाळा ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी ठरते.

ABOUT THE AUTHOR

...view details